मुंबई (प्रतिनिधी)- रयत संदेश न्यूज
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या पत्रकारांच्या आंतराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने येत्या ५ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूरमध्ये पंढरपूर अधिवेशन यशस्वी करणाऱ्या पदाधिकारी यांचा ‘शूर सरदारांचा’ हृदय सत्कार, एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आणि दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा यांसह अनेक महत्त्वपूर्ण सत्राच्या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होणार आहे. यात अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक विचारवंत यांची उपस्थिती असणार आहे ज्यात प्रवीणदादा गायकवाड, आ. श्रीकांत भारतीय, राणा सूर्यवंशी, रविंद्र चिंचोलकर आणि रविकांत तुपकर, व्यंकटेश जोशी यांचा समावेश असणार आहे.
प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के हे आगामी वर्षाचे उद्दिष्ट, पत्रकार हितासाठीच्या राज्यव्यापी उपक्रमांची दिशा आणि संघटन विस्तारासंबंधी महत्त्वपूर्ण विचार मांडतील. दिव्या भोसले, महासरचिटणीस, “प्रशिक्षणामागची भूमिका” आणि आंतराष्ट्रीय उपक्रम सांगणार आहेत. संदीप काळे यांच्या दोन महत्त्वाच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होणार आहे. ‘जगातल्या पत्रकारितेला लागलेली घरघर : एक चिंतन आणि उपाय’ (मराठी) आणि ‘The Hoarseness of Global Journalism: A Reflection and a Call for Solutions’ (English) ही पुस्तके सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केली जातील.
यानंतरचे विशेष आकर्षण म्हणजे “‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ जगातील १९५ देशांत जात आहोत — ते कसे?” हे सादरीकरण. दिव्या भोसले, गोविंद जोशी, स्नेहल पाटील आणि अक्षय श्रीकंठवार हे आंतरराष्ट्रीय पदाधिकारी या विषयावर संयुक्तरीत्या सादरीकरण देणार आहेत. यातून संघटनेच्या जागतिक विस्ताराची रणनीती यात उलगडण्यात येणार आहे.
दिवसभरातील दोन महत्त्वाच्या मार्गदर्शन सत्रांमध्ये प्रवीणदादा गायकवाड “संघटना वाढवून ती लोकाभिमुख कशी करायची?” या विषयावर भाष्य करतील, तर मा. आ. श्रीकांत भारतीय “संघटना वाढीचे स्वप्न पाहणाऱ्यांची कवचकुंडले” या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारनंतर मा. रविकांत तुपकर “लीड करणारा नेता कसा असावा?” या विषयावर कार्यकर्त्यांना दिशा देतील आणि शिवाजी गावडे “मी सक्रिय कसे राहायचे?” या विषयावर संवाद साधतील.
दरम्यान महाराष्ट्र राज्याचा वार्षिक प्लॅन या विषयावर व्यापक चर्चा होणार आहे. अनिल म्हस्के, किशोर कारंजेकर, गोरक्षनाथ मदने आणि राज्यभरातून उपस्थित राहणारे सर्व सहभागी या चर्चेत भूमिका निभावतील. संघटनेच्या आगामी योजनांची रूपरेषा, जिल्हास्तर ते राज्यस्तर संघटन बांधणी, पत्रकार संरक्षण आणि महिला पत्रकार सेल यांसारखे अनेक मुद्दे चर्चेत येणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले—
“५ डिसेंबरचा कार्यक्रम हा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्रातील चळवळीला नवी दिशा देणारा असेल. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आणि संघटनेच्या जागतिक विस्तारासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.”
सोलापूरमध्ये होणाऱ्या या अधिवेशनाबद्दल पत्रकार, कार्यकर्ते आणि अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता असून हा कार्यक्रम राज्यभरातील पत्रकार चळवळीचा महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोलापूर येथील हॉटेल फन रेसिडेन्सी, होटगी रोड येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या दिवसभराच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवहान ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सोलापूर जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे, माऊली डांगे, तौफिक नदाफ, सूरज कौलगे आणि सोलापूरच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.




