अमळनेर रयत संदेश न्यूज:-
अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्रीदत्त जयंतीनिमित्त गुरुवार, दि. 4 डिसेंबर रोजी भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात जन्मोत्सवासह भव्य याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसरातील ‘कमंडलू’स्थित भगवान श्रीगुरुदत्त व श्री अनघालक्ष्मी माता मंदिरात सकाळपासून सायंकाळीपर्यंत जन्मोत्सव, याग, हवन, बलिदान यासारख्या विविध पूजा-अर्चांसह मंत्रोपचार झाले. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणातील सकारात्मक अनुभूतीचा प्रत्यय आला.
भव्य यागासाठी नागपूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक रेयांशराज रत्ननिवास राणाजीत ऊर्फ लकी बन्सल, त्यांच्या मातोश्री गं. भा. रतिका रत्ननिवास राणाजीत, जळगावातील वास्तुतज्ज्ञ डॉ. मेहुल पटेल तसेच प्रसाद मुकुंद भंडारी व पुषंद उल्हास ढाके सपत्नीक यजमान होते. त्यांच्या हस्ते सुरूवातीला प्रथम सत्रात सकाळी 9 ते 11 या वेळेत पंचांग कर्म : त्यात प्रायश्चित्त, श्रीगणेश पूजन, वरुण पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, आयुष्यमंत्र जप, नांदी श्राद्ध झाले. 11 ते दुपारी 1 दरम्यान स्थापना कर्म : त्यात दत्त भद्र स्थापन, दत्तपीठ स्थापन, दत्तयंत्र स्थापन, देवता प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर द्वितीय सत्रात दुपारी 2 ते 4 या वेळेत अभिषेक महापूजा : 51 विशिष्ट वनौषधींयुक्त महाभिषेक, कुंडदेवता स्थापना, नवग्रह स्थापना, रुद्र स्थापना, कुशकंडीका, ग्रह हवन झाले. दुपारी 4 ते सायंकाळी 5 दरम्यान प्रधान देवता होम : दत्तमाला मंत्र, होम, विशेष होम, उत्तरांग होम झाला. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत बलिदान व पूर्णाहुती झाली. त्यानंतर सायंकाळी 6 ते 7 या वेळेत श्रीदत्त महाराज, श्री मंगळग्रह देवता, मंगळेश्वर श्री पंचमुखी हनुमानजी, मंगळेश्वरी श्री भूमिमाता यांची महाआरतींसह करुणा त्रिपदी विधी पार पडून यागाची सांगता झाली. याप्रसंगी मंदिरात भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
पुरोहित परशुराम शर्मा, शुभम वैष्णव, यश जोशी, चंद्रकांत जोशी, भूषण जोशी, मंदार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. त्यांना अतुल दीक्षित, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, हेमंत गोसावी, चेतन नाईक यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, श्रीमती जयश्री साबे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, सौ. सुनीताताई कुलकर्णी, सौ. आशाताई महाले यांच्यासह भाविक व मंदिरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-



