सोलापूर :
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने पत्रकारितेला नवसंजीवनी देणाऱ्या भव्य ‘केडर कॅम्प’चा सोलापूरमध्ये उत्साहात समारोप झाला. पंढरपूर अधिवेशन यशस्वी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा ‘शूर सरदार’ सन्मान सोहळाही या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला.* आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, आणि ज्येष्ठ मार्गदर्शक-विचारवंत आ. श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकारितेची तुलना समाजाच्या आरोग्याशी करताना म्हटले की, “डॉक्टर जसे शरीर तपासतात, तसे पत्रकार समाजाच्या विचारांची आणि लोकशाहीच्या नाडीची तपासणी करतात. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांना दिशा, संरक्षण आणि अभिमानाची नवी ओळख दिली आहे.” पत्रकारितेतील सत्य, पारदर्शकता आणि लोकहिताची भूमिका त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, “‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही पत्रकार तयार करणारी आणि पत्रकारिता टिकवणारी संघटना आहे. पत्रकारांच्या एकतेतच समाजातील अन्याय दूर करण्याची आणि लोकशाही मजबूत करण्याची खरी शक्ती आहे.” कौशल्यविकास, प्रशिक्षण आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या संघटनेच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
आ. श्रीकांत भारतीय यांनी संघटनात्मक चार मूलतत्त्वे — संपर्क, बैठक, कार्यक्रम आणि निर्णय — यांचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “जसा कर्ण कवच-कुंडल्यामुळे अजय झाला, तसे श्रद्धा, समर्पण आणि चारित्र्य असल्यास कोणतीही संघटना अढळ राहते. अहंकार बाजूला ठेवून सामूहिक भावनेने काम करणे हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे.”
कार्यक्रमात संदीप काळे यांच्या ‘जगातल्या पत्रकारितेला लागलेली घरघर’ (मराठी) आणि ‘The Hoarseness of Global Journalism’ (English) या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. समारोपीय सत्रात संघटनात्मक बांधणी, नेतृत्व विकास, तत्त्वनिष्ठ कार्यपद्धती आणि पत्रकार एकतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत रवींद्र चिंचोलकर, संचालक व्यंकटेश जोशी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात पंढरपूर, सोलापूर व महाराष्ट्रभरातील पदाधिकाऱ्यांचा ‘शूर सरदार’ म्हणून सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कोर टीममधील दिव्या भोसले, स्नेहल पाटील, गोविंद जोशी व अक्षय श्रीकंठवार यांना गौरविण्यात आले. पंढरपूर व सोलापूर कोर टीममधील शिलेदारांबरोबरच मुख्य कोर टीम महाराष्ट्रातील गोरक्षनाथ मदने, अमोल मतकर, अजित कुंकूलोळ, कुमार कडलग, रश्मी मारवाडी, पल्लवी शेटे, संगम कोटलवार, नरेंद्र देशमुख, किशोर कारंजेकर, कल्पेश महाले, बापूसाहेब पाटील, वैशाली पाटील, चेतन कात्रे, आकाश अमृतवार, बाळासाहेब गडाख आणि गोरक्ष नेहे स्वागत खपाले, माऊली डांगे, सुरज कौलगे, सुरज सरवदे, बालाजी फुगारे, तौफिक नदाफ, धनराज बगले, सचिन राठोड, सौरभ वाघमारे, दत्ता केरे, सादिक नदाफ, विजय पारसेकर अमोल माने, संदीप बागल, तेजस गांजाळे, समाधान व्हनसाळे, गोपाळ माळी, गणेश गांडुळे, रोहिदास भोरकडे, यांचा सन्मान करण्यात आला




