अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात धुळे येथील श्रीमती के. सी. अजमेरा रोटरी ब्लड सेंटरतर्फे रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी व भाविकांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २२ दात्यांनी यावेळी रक्तदान केले. रोटरी ब्लड सेंटरचे संचालक डॉ. संदीप चौधरी, तेजस जैन, दिनेश शिंदे, अश्विनी गवळी, वैष्णवी गिरासे यांनी रक्तसंकलन करून दात्यांना मार्गदर्शन केले. मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रक्तदात्यांसाठी विश्रांती आदींची सोय करण्यात आली होती.
सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्था आणि रोटरी ब्लड सेंटरतर्फे आगामी काळतही विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



