सरस्वती शिशु वाटिकेत ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अमळनेर रयतसंदेश न्युज : –
अखिल भारतीय शिक्षा संस्थान नवी दिल्ली संलग्न, विद्याभारती देवगिरी प्रांत अंतर्गत सरस्वती शिशु वाटिका, अमळनेर येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.
राष्ट्रीय शिक्षा निती 2020 नुसार मातृ भाषेला अग्रक्रम देत इंग्रजी सोबतच क्रियाकलाप आधारित शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या सरस्वती शिशु वाटिका अमळनेर येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधानाचार्या आरती नाईक यांनी केले. शिशूवाटिकेच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमास भारतीय सैन्यातील उत्तराखंड येथे सेवेत असलेले नायक दीपक पाटील हे सपत्नीक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे रोटरी क्लबचे सक्रिय सदस्य माजी डिस्ट्रिक्ट ऑफिसर कीर्तीकुमार कोठारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुरुवातीस आचार्या माहेश्वरी राजपूत यांनी स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व भारत माता पूजन करून सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. वर्षभरात वीरमरण आलेल्या सैनिकांना तसेच विविध क्षेत्रातील मृत पावलेल्या ज्ञात-अज्ञात महानुभावांस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर शिशूवाटिकेच्या विद्यार्थ्यांतील सैनिक व पोलीस कुटुंबांत समावेश होणारे पार्थवी गणेश पाटील, वृतिका राहुल पाटील, लाविष्का हर्षल पाटील या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचा तर शिशूवाटिकेच्या आचार्या सौ.दीपिका खैरनार यांचाही सैनिक पत्नी म्हणून सत्कार करण्यात आला.
अभिनवपणे काम करणाऱ्या सरस्वती शिशूवाटिकेत यावर्षीपासून सरस्वती बाल वाचनालयाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. या उपक्रमात वय वर्ष 6 ते 16 वयोगटातील मुलांकरिता वाचनासाठी बाल साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शिशुवाटिकेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऋतिका पाटील सावित्रीबाई फुले तर अक्षिता गव्हाणे झाशीची राणी, रुद्र पाटील सैनिक व लाविष्का पाटीलने भारतमातेची वेषभूषा केली. जूनियर व सीनियर क्लासच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक गीत सादर केले. चैतन्या रायगडे, मोक्षिका पाटील, देवांशी पाटील, कुंजल पाटील या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयीचे भाषण केले.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना व आलेल्या पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सामूहिक वंदे मातरम गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिशुवाटिकेच्या आचार्या किरण भदाणे व दीपिका खैरनार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रधानाचार्या आरती नाईक आचार्या माहेश्वरी राजपूत, कल्याणी पाटील, माधुरी बाविस्कर यांनी प्रयत्न केले.