अमळनेर तालुका प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
मारवड येथील कला महाविद्यालयात क्रांतीभास्कर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यातीथी अत्यंत उत्साहात आणि प्रेरणामयी वातावरणात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले सर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. प्रस्तुत प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या अथांग साहित्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला “अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शोषित, वंचित आणि कामगार वर्गाच्या व्यथा जगासमोर मांडल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही,” असे विचार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनीही अण्णाभाऊंच्या जीवनावर आधारित मनोगते व्यक्त केलेत व त्यांच्या डफावरील थापेची आणि क्रांतीगीतांची आठवण करून दिली.अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ. संजय पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




