अनंत निकमविरुद्ध डॉ.डिगंबर महालें सह,अनेकांनी पोलीस व प्रशासनाकडे केल्या सामूहिक तक्रारी,खोटे संदर्भ दिल्याचा आरोप

अमळनेर रयत संदेश न्यूज नेटवर्क –

अमळनेर येथील अनंत रमेश निकम याने सोमवार, दि. 29 जून 2026 रोजी त्याच्या व्हॉटस्‌‍ॲप, फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात श्री मंगळग्रह मंदिरावर ताबा मिळविण्याचा बेकायदेशीर कट उधळला! 13 वर्षांनंतर न्यायदेवतेचा ऐतिहासिक निकाल; खोट्या विश्वस्तांचा फेरफार अर्ज सपशेल फेटाळला! मुळासकट उपटून फेकला! असे त्याने त्यात सांगितले. तसेच यासंदर्भात निकम याने अधिक स्पष्टीकरण देताना वस्तुस्थितीदर्शक कोर्टाच्या निकालाची सत्य माहिती न देता खोटी, कपोलकल्पीत माहिती प्रसारीत केली. श्री मंगळ्ग्रह मंदिरासह मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी केली. परिणामी डॉ. महाले यांनी शनिवार, दि. 11 जुलै रोजी अमळनेर पोलिसांत निकमविरुद्ध फिर्याद दाखल केली. तर सोमवार, दि. 13 जुलै रोजी सकल हिंदू समाज तथा विविध हिंदुत्ववादी संघटना, मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी व परिसरात व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या अमळनेर शाखेने प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्याकडे शेकडो सह्यांचे तीन स्वतंत्र तक्रार अर्ज दाखल केले. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात तक्रारकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, डॉ. महाले यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांतील कार्य विशद करून म्हटले आहे, की अमळनेर येथील श्री मंगळदेव मंदिर मंडळ संदर्भात (नोफ्लद क्र. A1069) बाबत मी न्यासाच्या कार्यकारी मंडळात झालेल्या बदलासंदर्भात चेंज रिपोर्ट मा. सार्वजनिक न्यास नोफ्लदणी कार्यालय, जळगाव यांच्याकडे दाखल केलेला होता. त्यात पुराव्याचे शपथपत्र दाखल केले नाही या कारणास्तव माझा चौकशी अर्ज क्र. 248/2013 निशाणी 1 वरील बदल अहवाल अर्ज नामंजूर झालेला आहे. सदर निकाल दि. 02/06/2026 रोजी लागलेला असून त्याविरुद्ध आम्ही अपील देखील दाखल केलेले आहे. असे असताना दि. 29/06/2026 रोजी आरोपी अनंत रमेश निकम याने त्याच्या व्हॉटस्‌‍ॲप, फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यात अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरावर ताबा मिळविण्याचा बेकायदेशीर कट उधळला! 13 वर्षांनंतर न्यायदेवतेचा ऐतिहासिक निकाल; खोट्या विश्वस्तांचा फेरफार अर्ज सपशेल फेटाळला! मुळासकट उपटून फेकला! असे सांगितले आहे. तसेच यासंदर्भात निकम याने अधिक स्पष्टीकरण देताना मी दाखल केलेल्या अर्जासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक कोर्टाच्या निकालाची सत्य माहिती न देता पूर्णत: खोटी कपोलकल्पीत माहिती दिली. सदर व्हॉट्सॲप व्हिडिओचा 0.30.42 सेकंदापासून पुढे पाहिले असता त्यात न्यायालयाचा धारदार कडक ताशेरे

(Findings) या सदराखाली आरोपी अनंत निकम याने मी (फिर्यादी) खऱ्या फेरफार (अर्ज क्र. 496/2013)ची न्यायालयापासून जाणूनबुजून माहिती लपवून ठेवली व न्यायालयाची दिशाभूल करण्याचा गंभीर गुन्हा केला तसेच दि. 28/02/2013 रोजी कुठलीही न्यासाची वैध सभा झाली नव्हती. मी (फिर्यादी) केवळ बनावट कागद तयार करून खोट्या स्वाक्षऱ्यांचा आधार घेतला. तसेच

* सत्य लपवले आणि फसवणूक केली : अर्जदाराने (म्हणजे मी) मूळ न्यासाने दाखल केलेल्या खऱ्या फेरफार अर्जाची (496/2013) माहिती न्यायालयापासून जाणूनबुजून लपवून ठेवली आणि न्यायालयाची दिशाभूल करण्याचा गंभीर गुन्हा केला.

* कागदपत्रांची बनावटगिरी : 28 फेब्रुवारी 2013 रोजी न्यासाची कोणतीही वैध सभा झाली नव्हती. अर्जदाराने केवळ कागदावर बनावट ठराव तयार करून खोट्या स्वाक्षऱ्यांचा आधार घेतला.

* एकही पुरावा नाही : गेल्या 13 वर्षांत स्वत:ला खरे सिद्ध करण्यासाठी अर्जदाराला न्यायालयात एकही पुराव्याचे प्रतिज्ञापत्र (Affidavit Evidence) सादर करता आले नाही.

* अधिकारशून्य कारभार : डिगंबर महाले यांना श्री मंगळदेव मंदिर मंडळ या न्यासाच्या वतीने कोणताही फेरफार अहवाल किंवा अर्ज सादर करण्याचा काडीमात्र कायदेशीर अधिकार नव्हता, असे पूर्णत: असत्य व माझी बदनामीकारक तसेच वरील मुद्दे सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या निकालात कुठेही नसताना मे. न्यायालयाच्या निकालाशी छेडखानी करणारे कथन केले आहे.

वास्तविक फेरफार अर्ज क्र. 248/2013 जो मी अगोदर दाखल केलेला आहे व फेरफार अर्ज क्र. 496/2013 एकत्रित चालविण्यात यावे, अशी मी. मे. सहा. धर्मदाय आयुक्त सो. यांनी नि. 21 चा अर्जानुसार विनंती केलेली होती. त्यामुळे सत्य लपविले असे आरोपी अनंत निकम याचे म्हणणे पूर्णत: खोटे आहे. तसेच न्यायालयाच्या नावाने व्हॉटस्‌‍ॲप, फेसबुकद्वारे केलेल्या कथनाचा कोर्टाने त्यांच्या आदेशात कुठेही उल्लेख केलेला नाही. मात्र केवळ माझी समाजात बदनामी व्हावी तसेच मंगळग्रह सेवा संस्था व श्री मंगळग्रह मंदिर बदनाम व्हावे व गावात अशांतता व्हावी. तसेच भाविकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा या दुष्ट उद्देशाने आरोपी अनंत निकम याने न्यायालयाच्या नावे खोटे आरोप केलेले आहेत.

अनंत निकम याने सदर बाबतीत अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरावर ताबा मिळविण्याचा बेकायदेशीर कट उधळला! 13 वर्षांनंतर न्यायदेवतेचा ऐतिहासिक निकाल; खोट्या विश्वस्तांचा फेरफार अर्ज सपशेल फेटाळला! आदी मजकूर असलेली सार्वजनिक न्यास नोफ्लदणी कार्यालयाचे मा. मुख्य जनसंपर्क अधिकारी/अधीक्षक यांच्या नावे प्रेसनोट प्रसिद्ध केली.

डॉ. महाले यांनी मे. धर्मदाय उपायुक्त, मे. धर्मदाय सहाय्यक आयुक्त आणि मा. मुख्य जनसंपर्क अधिकारी/अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोफ्लदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव यांना सदर पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे काय? अशी चौकशीत्मक विचारणा केली असता त्यांनी असे कुठलेही पत्रक प्रसिद्ध केलेले नाही, असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे सदरचे प्रसिद्धी पत्रक अनंत निकम किंवा त्याच्या निकटवर्तीयांनी पत्रकारांना प्रेसनोट म्हणून देखील व्हॉटस्‌‍ॲपला पाठविलेले आहे व त्याचा व्हिडिओ देखील पाठविलेला आहे. सदरच्या व्हॉटस्‌‍ॲप व्हिडिओ संदर्भात अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यावरून सदर बाब ही सार्वजनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा, मला व श्री मंगळग्रह मंदिराला बदनाम करण्याचा आरोपीचा दुष्ट व विकृत उद्देश स्पष्टपणे दिसून येतो.

सदर चेंज रिपोर्टसंदर्भात अनंत निकम याने सोशल मीडिया व खोट्या प्रेसनोटच्या माध्यमातून केवळ चेंज रिपोर्ट अमान्य झालेला असताना कोर्टाच्या नावे वर नमूद केल्याप्रकारे खोटे (Findings) लोकांमध्ये प्रसारीत व प्रसिद्ध करून बेकायदेशीरपणे कोर्ट आदेशाचा चुकीचा अर्थ लावून माझी व श्री मंगळग्रह मंदिराची बदनामी केली आहे. श्री मंगळग्रह मंदिर तथा मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाचे व अन्य प्रतिष्ठित संस्थांचे अत्यंत सन्मानाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सदर मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शेकडो जण सदर मंदिरावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उपजीविका भागवितात. मंदिराच्या बदनामीमुळे या सर्वांना भावनिक व आर्थिक ठेच पोहोचली आहे. आरोपी निकम याचा या गैरप्रकारामागे कलुषित भावनेने माझी व श्री मंगळग्रह मंदिराची बदनामी व्हावी, शहरात अशांतता निर्माण व्हावी, हा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो. त्याची एकूणच गुन्हेगारी व उपद्रवी पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करून शहरातून हद्दपारसारखी किंवा इतर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

 

सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार

तक्रारीत म्हटले आहे, की आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य तथा पदाधिकारी आहोत. आम्ही हिंदूधर्मीय असल्याने आमचे आमच्या हिंदू धर्मावर कमालीचे प्रेम आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविषयी देखील आमच्या मनात कमालीचा आदर आहे. आमच्या धर्माचा कोणीही अनादर केल्यास तसेच आमचे मठ, मंदिर, देवस्थाने आदींची कुणीही बदनामी केल्यास ते आम्ही कदापीही सहन करणार नाही. आपल्या शहरातील अनंत रमेश निकम, राहणार कोर्टाजवळ, अमळनेर हा सातत्याने हिंदू धर्म, मंदिरे, भाजप यांच्यासंदर्भात बदनामीकारक पोस्ट व्हायरल करीत आहे. त्यामुळे आमच्यासह अनेक हिंदू धर्मियांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या आहेत. दीर्घकाळापासून आम्ही हे सारे काही सहन करीत आहोत. हिंदू असल्याने आम्ही संयमी व संहिष्णुवादी आहोत. याचा अर्थ आमच्या सहनशीलतेची कोणीही कितीही हद्दीपर्यंत परीक्षा पाहावी असे होत नाही. आता आमची सहनशक्ती संपली आहे. मात्र आम्ही भारताचे जबाबदार नागरिक असल्याने कायदा हातात न घेता आम्ही कायद्यालाच विनंती करीत आहोत, की अनंत निकम सामाजिक शांतता व सलोखा बिघडविण्याचे जे गंभीर प्रकार करीत आहे ते आपण तत्काळ थांबवावेत. त्याच्यावर कठोर कारवाई करावी. मुळातच अनंत निकमची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आपण कितीही बेछूट व बेजबाबदारपणे वागलो तरी आपले काहीच होत नाही या अविर्भावात तो असतो. त्याच्या असंवेदनशील, मनमानी व बेजबाबदार कृत्यांमुळे मोठा उद्रेक झाल्यास त्यातून मोठे मोर्चे, आंदोलने होऊन सामाजिक शांतता बिघडल्यास त्यासाठी सर्वस्वी अनंत निकम व आपणच जबाबदार राहाल.

 

व्हॉईस ऑफ मीडियाची तक्रार

आम्ही सर्व देशातील क्रमांक 1 ची व सर्वांत मोठी तसेच 70 हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे अर्थात व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य आहोत. मा. डॉ. श्री. डिगंबर महाले हे आमच्या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस आहेत. आम्हा सर्वांसाठी आणि संस्थेसाठीही ते अत्यंत आदरणीय आहेत. या पदासाठी पात्र ठरण्यासाठी जी योग्यता लागते ती त्यांना सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी त्यांनी 35 वर्षे निष्कलंक, निष्पक्ष आणि निडर पत्रकारिता केलेली आहे. जनमानसामध्ये अत्यंत सन्मानाचे स्थान निर्माण केलेले आहे. वाणी आणि लेखणी यावर प्रभुत्व मिळविले आहे. तसेच ते अध्यक्ष असलेली मंगळग्रह सेवा संस्था व सदर संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराला त्यांनी देशातच नव्हे; तर जगभरामध्ये प्रसिद्धी आणि कीर्ती मिळवून दिली आहे. मा. डॉ. श्री. महाले यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरणविषयक आणि पत्रकार म्हणून खूप मोठे व प्रदीर्घ कार्य आहे. मात्र, अमळनेर शहरातील अनंत निकम या वादग्रस्त व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने द्वेष भावनेने किंवा कुठल्यातरी गैरहेतूने मा. डॉ. श्री. महाले सर व श्री मंगळग्रह मंदिर यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे मा. डॉ. श्री. महाले सर व श्री मंगळग्रह मंदिर दोघांच्याही प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ही बाब आम्हालाही अपमानित करणारी तसेच जबर मानसिक धक्का देणारी आहे. कुठलाही अधिकार नसताना एखादी व्यक्ती न्यायालयाच्या निर्णयाशी छेडछाड करून कोणालाही आणि कोणत्याही मोठ्या धर्मस्थानाला कोणत्या हिमतीवर बदनाम करू शकतो? त्याला कायद्याचा धाक का वाटत नाही? असे प्रश्न पत्रकार म्हणून आम्हाला पडले आहेत. अनंत निकमची ही बेकायदेशीर, अनिर्बंध वृत्ती आणि मुजोर प्रवृत्ती याला कायाद्याचा चाप बसणे गरजेचे आहे. आमची आपणास नम्र विनंती आहे, की अनंत निकम सोशल मीडियाचा करीत असलेल्या गैरवापरावर तत्काळ प्रतिबंध करावा. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा याविरुद्ध राज्यभर आमची संघटना आंदोलन छेडेल. त्यासाठी सर्वस्वी अनंत निकम आणि आपणच जबाबदार राहाल.

 

मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी व व्यावसायिकांची तक्रार

आम्ही सर्व सह्या करणारे मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांचे कर्मचारी आहोत. सदर संस्थेतर्फेच श्री मंगळग्रह मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. संस्थेने केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक, पर्यावरणविषयक, आरोग्यविषयक, राष्ट्रीय उपक्रमात्मक, शैक्षणिक कार्य तसेच श्री मंगळग्रह मंदिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजन व विकासकामांमुळे दिवसेंदिवस संस्थेची व श्री मंगळग्रह मंदिराची कीर्ती देशात व देशाबाहेरही पसरली आहे. संस्थेला व मंदिराला महाराष्ट्र शासनासह अनेक प्रतिष्ठित संस्था व संघटनांचे अत्यंत बहुमानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. संस्थेला चार आयएसओ मानांकने आहेत. भारतीय टपाल विभागाने संस्थेच्या सन्मानार्थ स्पेशल पाकीट जारी केले आहे. असा बहुमान मिळविणारे खानदेशातील हे एकमात्र व राज्यातील दुसरेच मंदिर आहे. ‌‘पर्यटन मित्र‌’ हा शासनाच्या पर्यटन विभागातर्फे पुरस्कार मिळालेले राज्यातील एकमात्र मंदिर आहे. हे सारे काही मंगळग्रह सेवा संस्थेच्या स्वच्छ, पारदर्शक व नियोजनबद्ध कारभारामुळे बहुमान मिळाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले हे शहरातीलच नव्हे; तर राज्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहे. अनेक प्रतिष्ठित संस्था व संघटनांवर ते अनेक प्रकारच्या बहुमानाच्या पदांवर कार्यरत होते व आहेत. त्यांच्याविरुद्ध आजपर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. ते गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस व प्रशासनालाही सर्वतोपरी सहकार्य करतात. खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा करतात. पर्यावरणाबाबतही त्यांचे मोठे योगदान आहे. डॉ. डिगंबर महाले सर आमचे कुटुंबप्रमुख म्हणून ते आम्हाला अत्यंत आदरस्थानी आहेत. आम्हा सर्वांची ते अत्यंत जिव्हाळ्याने काळजी घेतात. असे असतानाही केवळ कुठल्या तरी द्वेषापोटी किंवा गैरहेतूने अनंत निकम याने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांची अत्यंत असह्य बदनामी केली आहे. या बदनामीमुळे मंदिरासह डॉ. डिगंबर महाले यांची प्रतिमा जनमानसांमध्ये खराब झाली आहे. मंदिरात भाविकांचे प्रमाण देखील कमी झाले आहे. अनेक भाविक आम्हाला अनंत निकमने केलेल्या बदनामीविषयी विचारणा करतात. त्यावेळी आम्हाला अत्यंत अपमानीत झाल्यासारखे वाटते. अनंत निकममुळे दिवसेंदिवस मंगळग्रह सेवा संस्थेची, श्री मंगळग्रह मंदिराची व डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी वाढल्यास त्याचा विपरीत परिणाम थेट आमच्यावर होईल. आमचा संसार मंगळग्रह सेवा संस्था जो पगार देते त्याच्यावर चालतो. आम्ही सर्व हिंदू असल्याने आमचे आमच्या धर्मावर आणि श्री मंगळग्रह मंदिरावर अपार श्रद्धा आहे. अनंत निकम याच्या पोस्टमुळे आम्ही धार्मिकरित्याही दुखावले गेलो आहोत. हल्ली प्रचंड बेरोजगारी आहे. मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून आमचे संसार स्थिरावले आहेत. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची व आरोग्याची सोय झालेली आहे. अनंत निकम याच्या या बेजबाबदार वागण्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत आहोत. अशा समाजविघातक प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

सदरची निवेदने तहसीलदार रूपेशकुमार सुराणा व पोलिसांच्या गोपनीय शाखेचे सिद्धांत शिसोदे यांनी स्वीकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page