रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर(प्रतिनिधी) बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येने पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते.
*बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण* केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही
शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.
बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आज बदलापूर बंदची हाक दिली आहे आंदोलन सुरु असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शाळेचा माफीनामा
या सगळ्या प्रकारानंतर शाळेकडून एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेचे पोलीसांना सहकार्य केले. या दुर्दैवी घटनेनंतर संबंधित कर्मचारीवर कठोर शिक्षा व्हावी या साठी संस्थेचा आग्रह आहे, असे शाळेने निवेदनात म्हटले आहे.