अमळनेर रयत संदेश न्यूज:-
अवकाळी व सततच्या मुसळधार पावसामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आ. अनिल भाईदास पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कृषिमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांना मदतीसाठी निवेदन दिले.
तसेच उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची विनंती केली.
आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने मारलेली दडी, नंतर झालेली अतिवृष्टी आणि अखंड पाऊस यामुळे बळीराजाचा हंगाम पूर्णतः हातातून निसटला आहे. सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली पिकेही नष्ट झाली आहेत.
अमळनेर मतदारसंघातील एकूण ८१,२१२ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ४६,९४८ हेक्टरवरील कपाशी, २९,४१२ हेक्टरवरील मका, ३,५४४ हेक्टरवरील ज्वारी, ७४७ हेक्टरवरील बाजरी आणि २०० हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शासनाच्या निकषानुसार फक्त उभ्या पिकांचाच पंचनामा केला जातो. मात्र अवकाळी पावसामुळे कापणी झालेली पिकेही शेतात पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे कापणी झालेल्या मका, ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकांच्याही पंचनाम्यांचे आदेश देऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांची राज्य सरकारकडे केली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अन्यथा बळीराजाच्या आयुष्यातील संकट अधिक गंभीर बनेल, अशी विनंती आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात केली आहे.


