दिवाळीपूर्वी अनुदान नाही. एक वर्ष झाले, कर्जमुक्ती नाही.
धरणगांव प्रतिनिधी-
धरणगाव : “शेतकऱ्यांच्या अश्रूंना दिवाळीचा उजेड कधी दिसणार?” या हृदयद्रावक प्रश्नाने आज संपूर्ण धरणगाव हादरले. महाविकास आघाडीच्या वतीने “शेतकरी हंबरडा मोर्चा” काढण्यात आला. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान आणि थकीत कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह घोषणाबाजी करत उड्डाणपुलावर रास्ता रोको केला. छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून सुरू झालेल्या या मोर्चाने शहराच्या हृदयात आंदोलनाची ठिणगी पेटवली. तहसिलदार व कृषी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देताना शेतकऱ्यांनी डोळ्यातून ओघळणारे अश्रू लपवले नाहीत.
▪️जाहीर केलं, पण दिलं नाही!
एक वर्षापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “सर्व शेतकऱ्यांची ७/१२ कोरी करून कर्जमुक्ती” अशी घोषणा केली होती. रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपयांचे अनुदानही जाहीर झाले, पण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. “आश्वासनाच्या दिव्यांनी आमच्या आयुष्याचं काळोखच वाढवलं,” असा आरोप यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला.
▪️शेतकऱ्यांच्या मागण्या▪️
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यात दिवाळीपूर्वी मदत मिळावी. सर्व शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करून कर्जमुक्ती करण्यात यावी. वाहून गेलेली घरे, गुरेढोरे, जनावरं व कुटुंबीयांच्या नुकसानीवर तात्काळ अनुदान मिळावे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना रुपये ५०,००० सानुग्रह अनुदान मिळावे. मागील निकषांप्रमाणे पिक विमा मिळावा. शेतमालाची हमीभावाने खरेदी करावी. खतांच्या किमती कमी करून जीएसटी रद्द करावा. उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्वारीची तात्काळ खरेदी करावी.
▪️शेतकऱ्यांचा हंबरडा, नेत्यांचा निर्धार! –
या मोर्चात शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख जयदीप पाटील, राष्ट्रवादी (श.प.)चे तालुकाध्यक्ष संजय पाटील, भा.रा.काँग्रेसचे जेष्ठ नेते महेश (बंटी) पवार, आदी मविआ च्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. “हे आंदोलन राजकारणासाठी नाही, तर उपाशी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी आहे,” असा निर्धार यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. रस्त्यावर बैलगाड्या उभ्या राहिल्या, शेतकरी, कार्यकर्ते व महिला भगिनींनी आक्रोश केला आणि तरुण शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात आवाज बुलंद केला.
“दिवाळी आली, पण घरात अंधारच!”
अतिवृष्टी, पिकनुकसान आणि अपूर्ण आश्वासनांच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आज धरणगावातून महाराष्ट्रात घुमला. “दिवाळी आली तरी घरात अन्न नाही, अनुदान नाही, कर्जमुक्ती नाही,” असा आक्रोश व्यक्त करत शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात एकच हाक दिली- “आमचं हक्काचं अनुदान द्या, आम्हाला जगू द्या!” हंबरडा आंदोलनप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, लीलाधर पाटील, परमेश्वर महाजन, विजय पाटील, संतोष सोनवणे, कृपाराम महाजन, राहुल रोकडे, शुभम महाजन, गजानन महाजन, विनोद रोकडे, रमेश पारधी, वसंत पारधी, सुनिल चव्हाण, भाऊसाहेब किरण मराठे, जितेंद्र धनगर, रणजित सिकरवार, सतिष बोरसे, कैलास चौधरी, भीमराव धनगर, गोपाल चौधरी, गजानन महाजन, प्रेमराज चौधरी, गोपाल महाजन, वसीम खान, मनोज पटूणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय पाटील, बाळासाहेब पाटील, गोविंद कंखरे, भरत मराठे, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, कल्पिताताई पाटील, एकनाथ पाटील, भगवान शिंदे, आबा पाटील, परेश गुजर, मोहीत पवार, दिनकर पाटील, लक्ष्मणराव पाटील, खलील (बंटी) खान, गोपाल माळी, सुभाष पाटील, अमित शिंदे, नारायण चौधरी, रामकृष्ण पवार, प्रमोद पाटील, राहुल पाटील, साजिद कुरेशी, प्रफुल पवार, जुनेद बागवान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रा.सम्राट परीहार, रामचंद्र माळी, महेश पवार, नंदलाल महाजन, सुनिल बडगुजर, योगेश येवले या तिन्ही पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि असंख्य शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी झाले.


