अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
मारवड येथील कै. न्हानाभाऊ म.तु. पाटील कला महाविद्यालयाच्या वतीने कळमसरे ता.अमळनेर येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निर्देशाने मारवड ता.अमळनेर येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयातील युवक सरसावले आहेत. या कामासाठी महाविद्यालयाने कळमसरे हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. या दत्तक गावात सात दिवस निवासी श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी 50 शिबिरार्थींची निवड करण्यात आली असून आज दि. 16 जानेवारी रोजी दत्तक गावातील माजी सैनिक जयदीपसिंग धनसिंग सिसोदिया यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या सात दिवसात महाविद्यालयीन युवक व युवती शाश्वत विकासाबरोबरच स्वच्छ भारत अभियान, नशा मुक्ती, वनसंवर्धन, व्यक्तिमत्व विकास, आपत्ती व्यवस्थापन, बालविवाह थांबविण्यासाठी जनजागृती, मतदार जनजागृती अभियान, सहज योग ध्यान, राष्ट्रीय शिक्षण हक्क कायद्याबाबत जनजागृती, जागो ग्राहक जागो व दत्तक गावातील स्वातंत्र्य सैनिक यांच्या कार्याचा उजाळा आदी कार्यक्रम राबविणार आहेत. कळमसरे येथील जि.प. मराठी शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, कळमसरे चे सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत, मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि. जिभाऊ पाटील, माजी जि.प. सदस्य शांताराम पाटील, कपिलेश्वर संस्थांनचे सचिव मगन पाटील, कळमसरे जि. प.शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक किसनसिंग सिसोदिया, संस्थेचे उपाध्यक्ष देविदास साळुंखे, संचालक युवराज पाटील, सुरेश साळुंखे, महारू शिसोदे, सुरेश शिंदे, चंद्रकांत शिसोदे, राजेंद्र पाटील, पत्रकार बाबुलाल पाटील, शामकांत पाटील, हरिभाऊ मारवडकर,श्री. के.व्ही.पाटिल, प्राचार्य डॉ. वसंत देसले, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, महमूदखॉं पठाण, जि. प. शाळेचे किशोर सिसोदे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक केशव बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संजय महाजन यांनी तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी यांनी केले.



