महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स”चा भावनिक समारोप साडेचार हजार पत्रकार व कुटुंबीयांचा सहभाग

मुंबई प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” या राज्यव्यापी ध्यान उपक्रमाचा आज दहाव्या दिवशी भावनिक वातावरणात समारोप झाला. गेल्या दहा दिवसांपासून दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत महाराष्ट्रातील तब्बल साडेचार हजार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमित सहभाग नोंदवत या साधना प्रवासाचा भाग घेतला. या दहा दिवसांत निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा, आत्मिक शांतता आणि परस्परांतील जिव्हाळा यामुळे समारोप सोहळा विशेष भावनिक ठरला. योगध्यान उपक्रमाच्या निमित्ताने सलिल पुळेकर यांनी ‘सुदर्शन क्रिया’विषयी सविस्तर मार्गदर्शन करत सांगितले

यावेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी ध्यानाचे व्यापक महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, ध्यान ही केवळ वैयक्तिक शांततेची प्रक्रिया नसून सामाजिक परिवर्तनाची शक्ती आहे.

या समारोपप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, ज्येष्ठ पत्रकार चेतन बंडेवार तसेच ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, पत्रकारांच्या मानसिक आरोग्याचा विषय अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला होता; मात्र या उपक्रमामुळे त्या प्रश्नाला एक सकारात्मक आणि सशक्त व्यासपीठ मिळाले आहे. पत्रकारांचे काम केवळ बातम्या देणे नसून समाजातील वेदना, संघर्ष आणि सत्य लोकांसमोर मांडणे आहे. अपघात, गुन्हे, राजकीय घडामोडी आणि सामाजिक तणावांशी सतत सामना करताना पत्रकारांच्या मनावर मोठा ताण साचत असतो. अशा परिस्थितीत ध्यान, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया यांसारख्या साधना मोठा आधार देऊ शकतात. “हा उपक्रम केवळ दहा दिवसांचा कार्यक्रम न राहता पत्रकारांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा. मानसिकदृष्ट्या सक्षम पत्रकारच समाजाला योग्य दिशा देऊ शकतो,” असे सांगत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि ‘तणावमुक्त, सजग व सशक्त पत्रकार समाज’ घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार चेतन बंडेवार यांनी या उपक्रमाला “पत्रकारितेतील अंतर्मनाचा उत्सव” असे संबोधले. ते म्हणाले की, पत्रकार दररोज इतरांच्या आयुष्यातील घडामोडी जगासमोर मांडतो; परंतु स्वतःच्या मनाकडे पाहण्यासाठी त्याला वेळ मिळत नाही. या दहा दिवसांच्या साधनेमुळे पत्रकारांना स्वतःशी संवाद साधण्याची, अंतर्मनाशी जोडण्याची आणि मानसिक थकवा दूर करण्याची संधी मिळाली. बातम्यांच्या धावपळीत आणि वाढत्या डिजिटल दबावात निर्माण होणारा मानसिक ताण ध्यान आणि श्वसनसाधनेमुळे कमी होतो. “दहा दिवसांचा हा प्रवास म्हणजे एक नवी सुरुवात आहे. ही साधना नियमित ठेवली तर विचारांमध्ये स्पष्टता, निर्णयक्षमतेत परिपक्वता आणि लेखनात संवेदनशीलता वाढेल,” असे त्यांनी नमूद केले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सर्व विंग प्रमुख अमोल मतकर यांनीही उपस्थितांना संबोधित करत सांगितले की, या उपक्रमाने पत्रकारांना एकात्मतेचे व्यासपीठ दिले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकार एकाच वेळी साधनेत सहभागी झाले, ही संघटनात्मक ताकदीची जाणीव करून देणारी बाब आहे. पुढील काळात अशा उपक्रमांना अधिक व्यापक रूप देऊन पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दहा दिवसांच्या या सामूहिक साधना प्रवासाने महाराष्ट्रातील पत्रकार समाजात मानसिक आरोग्याविषयी नवी जाणीव निर्माण केली आहे. “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” हा उपक्रम केवळ ध्यानवर्ग न ठरता पत्रकारांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडविणारी चळवळ म्हणून पुढे आला असून, त्याचा समारोप हा एका नव्या सुरुवातीची नांदी ठरल्याची भावना सहभागी पत्रकारांनी व्यक्त केली.

सर्व यशस्वी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या टीमसोबत तसेच महाराष्ट्रातील प्रमुख संपादक व पदाधिकारी मंडळींसमवेत पूज्य “श्री श्री रविशंकर हे थेट संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम संपूर्ण संघटनेसाठी एक ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’च्या स्थापनेमागील उद्दिष्ट, आतापर्यंतची वाटचाल आणि जागतिक स्तरावरील कार्याचा आढावा मांडला जावा. महाराष्ट्रातील संपादक मंडळींचा परिचय करून देताना त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आणि योगदान अधोरेखित करण्यातयेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page