अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
अमळनेर येथील पंचायत समितीच्या समग्र शिक्षा (समावेशित शिक्षण विभाग) अंतर्गत तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष फिजिओथेरपी (भौतिकोपचार) व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य शाळेच्या परिसरात संपन्न झालेल्या या शिबिरात तालुक्यातील अनेक गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला.*
*या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. एन. आर. पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री.रावसाहेब पाटील साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक हालचाली सुलभ व्हाव्या यासाठी पंचायत समितीचा समावेशित शिक्षण विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. दिव्यांग मुलांच्या शारीरिक प्रगतीसाठी अशा उपचारांची मोठी मदत होते.* 
*या कॅम्पमध्ये अमळनेर येथील प्रसिद्ध तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ. रितिक भरत कोठारी व चाहत रितिक कोठारी आणि त्यांच्या टीम यांनी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली. मेंदूचा पक्षघात (Cerebral Palsy) व इतर शारीरिक समस्या असलेल्या मुलांना त्यांनी व्यायामाच्या विविध पद्धती सांगितल्या व पालकांना घरच्या घरी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.*
*शिबिरासाठी लोकमान्य शाळेचे मुख्याध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांनी आपापल्या केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.*
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित शिक्षण विभागाचे सर्व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांची नोंदणी करणे, त्यांना उपचारासाठी मदत करणे आणि पालकांच्या शंकांचे निरसन करणे यामध्ये केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा मोठा सहभाग होता.*
*या शिबिरामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना एकाच छताखाली तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.*



