वैजापूर येथे HPV लसीकरण जनजागृती रॅली; किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षण अभियान संपन्न….* 

चोपडा प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

वैजापूर (ता. चोपडा), दि. 23 मार्च – आरोग्य विभाग चोपडा, भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, सुनंदन बहुउद्देशीय संस्था, चोपडा आणि Jhpiego संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वैजापूर येथे एचपीव्ही (HPV) लसीकरण जनजागृती रॅली व किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी जनजागृती अभियान उत्साहात पार पडले.

यावेळी शासकीय आदिवासी मुलींची आश्रम शाळा, वैजापूर येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थिनी, समाजकार्य महाविद्यालयातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी, वैजापूर आरोग्य विभाग, सुनंदन बहुउद्देशीय संस्था तसेच Jhpiego संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यानंतर आयोजित कार्यक्रमात किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV लसीकरणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजापूर चे सरपंच श्री. दत्ता पावरा होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बारेला, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. मारोती गायकवाड, डॉ. आम्रपाली मुरार, श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, तसेच आश्रमशाळेच्या अधीक्षिका प्रियंका चक्रनारायण उपस्थित होत्या. प्रा. डॉ. मारोती गायकवाड यांनी HPV लसीकरणाचे फायदे स्पष्ट करताना, या लसीमुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, असे सांगितले. डॉ. सुनील बारेला यांनी लसीकरणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थिनींनी सक्रिय प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले. डॉ. आम्रपाली मुरार यांनी ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींसाठी HPV लसीकरण अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. तसेच श्री. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी संस्थेच्या आरोग्यविषयक कार्याचा आढावा घेतला.

यावेळी सरपंच श्री. पावरा यांनी गावातील किशोरवयीन मुलींनी या अभियानाचा लाभ घेऊन HPV लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय बागुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहानी गावित यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page