अमळनेर-नाशिक बसची वेळ धुळे मुंबई ट्रेनला जोडणारी हवी. प्रवाशांची गैरसोय न थांबल्यास आंदोलनाचा इशारा

अमळनेर तालुका प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

अमळनेर येथून पहाटे ५:१५ वाजता सुटणारी अमळनेर-नाशिक ही बस प्रवाशांच्या सोयीपेक्षा गैरसोयीचीच ठरत आहे. या बसच्या चुकीच्या वेळेमुळे शेकडो प्रवाशांना धुळे-मुंबई ही महत्त्वाची रेल्वे पकडणे अशक्य होत असून, आगार प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास अमळनेर बस स्थानकावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी दिला आहे.

अमळनेर येथून पहाटे ५:१५ वाजता निघणारी बस अमळनेर रेल्वे स्टेशनवर साधारण ६ ते ६:१० च्या दरम्यान पोहोचते. याच वेळेत धुळ्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे निघत असल्याने, प्रवाशांची मोठी धावपळ होते आणि अनेकदा ही रेल्वे हुकते. अमळनेरमधून मुंबईला जाणारे व्यापारी, नोकरदार आणि सामान्य प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, बसच्या विसंगत वेळेमुळे या प्रवाशांना खासगी रिक्षांचा आधार घ्यावा लागतो किंवा धावपळ करावी लागते.

प्रवाशांच्या वतीने ॲड. सारांश सोनार यांनी लक्ष वेधताना सांगितले की, सदर बस पहाटे ५:१५ ऐवजी ४:४५ वाजता आगारातून सोडण्यात यावी.

बस आगारातून निघाल्यावर प्रथम ‘बारापत्थर’ मार्गे न जाता थेट रेल्वे स्टेशनवर नेण्यात यावी. हा बदल केल्यास शेकडो प्रवाशांची सोय होईल आणि पर्यायाने एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी भर पडेल.

आमदारांकडे हस्तक्षेप करण्याची विनंती

अनेक दिवसांपासून आगार प्रमुखांकडे ही मागणी केली जात आहे, मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या गंभीर प्रश्नी आमदार अनिल पाटील यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आगार व्यवस्थापकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंतीही ॲड. सारांश सोनार यांनी केली आहे.

———-

“अमळनेरच्या प्रवाशांना मुंबई प्रवासासाठी धुळे रेल्वे सोयीची आहे, पण बसच्या वेळेअभावी हा लाभ घेता येत नाही. जर प्रशासनाने तात्काळ वेळ आणि मार्ग बदलला नाही, तर आम्ही प्रवाशांच्या हितासाठी अमळनेर स्थानकावर धरणे आंदोलन छेडू.”

— ॲड. सारांश धनंजय सोनार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page