अमळनेर प्रतिनिधी :-
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार प्रदर्शनाने “सांस्कृतिक कला उत्सव २०२४” मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्लनाने करण्यात आले. यावेळी बोलतांना सौ.जयश्री पाटील यांनी सांगितले की,
‘शहरातील उच्चभ्रू वस्तीत गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे’
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील हे होते ‘विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासह कलेच्या प्रांतातही पुढे यावे’ असे आवाहन यावेळी अध्यक्षिय भाषणात अशोक पाटील यांनी केले. तर गरीब गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकासासह मंच उपलब्ध करून देण्याचा उद्देश सांस्कृतिक कला उत्सवाच्या माध्यमातून सफल होतो असे प्रास्ताविकात मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव सौ योगिता अशोक पाटील कृ.उ.बा संचालक समाधान धनगर, नितीन पाटील भाईदास भिल शरद पाटील गटसचिव संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार, चौबारी हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास,मुख्याध्यापक आशिष पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ गीतांजली पाटील यांनी केले. आभार सौ.संगीता पाटील यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थी दिनेश सनेर याने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे पालक दिलीप सनेर यांचा सत्कार करण्यात आला. विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साने गुरुजी विद्या मंदिर व सरस्वती विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत सादर केल्याबद्दल साहित्य संमेलन संयोजन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचे वितरण सौ जयश्री पाटील यांचे हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले.
सांस्कृतिक कला उत्सवात बाल विद्यार्थ्यांनी सादर केलेले पालकांचे शैक्षणिक प्रश्नावर भाष्य करणारे “जागरूकता” या नाटकासह ‘ अफवा ‘ या अहिराणी नाटकास उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली. चिमुकल्या बाल कलाकारांनी सादर केलेले ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला, मामाच्या गावाला जाऊ या, इतनिसी हसी, लल्लाटी भंडारा या नृत्यासह गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे मंचावरील सादरीकरण आगळे वेगळे ठरले. वाडी वाडी चंदनवाडी, गोंडा वाली पोर, पोरी करी गई तू मला बावरा या खानदेशी गीतांवरील नृत्य लक्षवेधी ठरले. तर ‘ ये देश मेरे तेरी शान से बढके’ , गर्जा महाराष्ट्र माझा आदि देशभक्तीपर नृत्य व गीत विद्यार्थ्यांनी सादर करीत वातावरण गंभीर केले होते. अहिराणी, मराठी, हिंदी गीतांसह विविध सांस्कृतिक लोक नृत्य यावेळी सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांची मने जिंकली.
याप्रसंगी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण संरक्षणाची व जागृतीची शपथ मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी व विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक आनंदा पाटील, ऋषिकेश महाळपुरकर, धर्मा धनगर, सौ.शितल पाटील यांचेसह संस्थेचे शिक्षकेतर कर्मचारी गजानन पाटील, हेमंत बडगुजर, सागर भावसार,समाधान शिंदे आदींनी प्रयत्न केले.