अमळनेर रयतसंदेश न्युज:-
(मारवड व परिसर विकास मंच आणि मिल के चलो असोसिएशन अमळनेर यांचा संयुक्त प्रकल्प)
सुटी कालावधीत बच्चे कंपनीसाठी विज्ञानाचे धडे…
दि १८ मे २०२४ शनिवार रोजी अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे गावातील मुख्य चौक असलेल्या मारुती मंदीराच्या पारावर डॉ.कलाम फिरत्या प्रयोग शाळेच्या माध्यमातून गावातील व सुटीनिमित्त आजोळी आलेले बाहेर गावचे असे एकूण तब्बल ३५ ते ४० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपकरण हाताळून व निरीक्षणातून विज्ञानाचे धडे घेतले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक व पालकही बहुसंख्येने उपस्थित होते.
मारवड व परिसर विकास मंच आणि मिल के चलो असोसिएशन अमळनेर यांचा संयुक्त प्रकल्प “डॉ कलाम फिरती प्रयोगशाळा” हा उपक्रम आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे साहेब यांच्या संकल्पनेतून व मिल के चलो असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुध्द पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला असून त्याचा उद्देश ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना समजण्यासाठी व प्रत्यक्ष हाताळण्यासाठी लागणारे प्रयोग साहित्य व उपकरणे सहज उपलब्ध व्हावेत तसेच त्यांच्यामध्ये विज्ञान विषयाबद्दल आवड निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा व भविष्यात वैज्ञानिक घडावेत असा आहे. खरे तर हा उपक्रम तालुक्यातील २० मोठ्या गावात राबविला जात आहे. परंतु सुटी कालावधीत सदर उपक्रमाचा तालुक्यातील उर्वरित इतर गावांनाही लाभ व्हावा या उद्देशाने सावखेडा गावाची प्राधान्याने निवड करण्यात आली होती. सावखेडा गावाचे उपसरपंच रविंद्र केशव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मगन सोनवणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मिल के चलो असोसिएशन चे सदस्य तथा मार्गदर्शक प्रा.विनायक पाटील सर, अनिल पाटील सर व फिरती प्रयोग शाळा सारथी दिनेश कोळी यांचे व तसेच गावातील उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरीक व पालक यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक दत्ता सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन सावखेडा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवान सोनवणे सर यांनी केले.
यात सुरवातीला एक तास मुलांचे विज्ञानावर आधारीत सत्र घेण्यात आले नंतर या सर्व मुलांना गाडीतील सर्व मॉडेल्स दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला ३५ ते ४० विद्यार्थी उपस्थित होते. शिवाय २०-२२ गावकरी देखील हजर होते. मुलांनी याचा खुप आनंद घेतला. कार्यक्रमात विशेष उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना सावखेडा गावचे सुपूत्र दत्ता सोनवणे सर यांनी पुस्तकांच्या स्वरुपात बक्षिसे दिली. शिवाय सावखेडा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवान सोनवणे सर यांनी शाळा नियमित सुरू झाल्यावर पून्हा एकदा भेटीची विनंती केली.
कार्यक्रमास सावखेडा गावचे उपसरपंच रविंद्र कदम, मगन सोनवणे, दिनेश कदम, निंबाजी कदम, बिपीन सोनवणे, भगवान सोनवणे, रघुनाथ भिल, तानाजी लोहार, प्रविण पाटील, माधव भोई, पितांबर कदम, रत्नाकर महाले, रमेश सोनवणे, सुरेश महाले, पंकज बोरसे, प्रताप कदम, भरत लोहार, रविंद्र महाले, निलेश सोनवणे तसेच गावातील व सुटीनिमित्त बाहेरगावाहून आलेले मुले-मुली बहुसंख्येने उपस्थित होते.