स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी वेळ, संयम आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही-मयुर भंगाळे

अमळनेर प्रतिनिधी : रयत संदेश न्यूज नेटवर्क

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा परीक्षांच्या आव्हानात्मक प्रवासात संयम, नियोजन आणि सातत्य या त्रिसूत्रीचे महत्त्व अधोरेखित करत उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना दिलखुलास संवादातून यशाचा मंत्र दिला.

कार्यक्रमाच्या विचारपीठावर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, श्रम साफल्य अभ्यासिका वर्गाचे संचालक के. एल. पाटील, साने गुरुजी वाचनालयाचे संचालक तथा पत्रकार ईश्वर महाजन, तसेच जिजाऊ अभ्यासिका केंद्राचे संचालक विशाल घिसाडी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय संचलित स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार यांनी केले.

मार्गदर्शन करताना मयूर भंगाळे म्हणाले, “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी वेळ, संयम आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही. लगेच यश मिळेल, अशी अपेक्षा ठेवू नका. अभ्यासाचे नियोजन करा, प्रत्येक विषयाच्या नोट्स स्वतः तयार करा. नोट्स तयार करताना विषय अधिक स्पष्ट होतो आणि लक्षातही राहतो.”

ते पुढे म्हणाले की, परीक्षेच्या क्लुप्त्या जाणून घेणे, बारीकसारीक प्रश्न समजून घेणे आणि वेळेचे काटेकोर नियोजन करणे अत्यावश्यक आहे. “दिवसभरात आपण किती वेळ वाया घालवतो, याचा आढावा घ्या. सोशल मीडियापासून दूर राहा. मी स्वतः दोन वर्षे मोबाईलपासून दूर राहिलो, तेव्हा मला यश मिळाले,” असा स्वतःचा अनुभवही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.

ग्रामीण भागातील कानळदासारख्या गावात राहून तयारी करतांना आलेल्या अडचणींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, पुण्यासारख्या शहरात वेळ वाया जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी गावात स्वतःला पूर्णपणे अभ्यासासाठी झोकून दिले. सलग तीन वर्षे यूपीएससी परीक्षेत अपयश आले, तरी निराश न होता सातत्य ठेवले आणि अखेर २०२३ मध्ये यश संपादन केले.

“प्रश्न विचारणारी पिढी घडली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत तुमच्या शंकांचे निरसन होणार नाही. अभ्यास केल्याशिवाय प्रश्न निर्माण होत नाहीत,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुटुंबाचा विश्वास जिंकणे, आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवणे आणि त्यागाची भावना जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “नियोजनाशिवाय यश नाही; टार्गेट निश्चित करा आणि त्यासाठी झटून द्या,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात साने गुरुजी वाचनालयाचे संचालक तथा पत्रकार ईश्वर महाजन यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, “ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. मेहनतीशिवाय पर्याय नाही. सातत्य, प्रामाणिकपणा आणि ध्येयवेडेपणा यांच्यामुळेच यशाची शिखरे गाठता येतात.” त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी संचालक विजयसिंह पवार यांनी मान्यवरांचे आभार मानले. यावेळी कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अमेय आचार्य यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साने गुरुजी वाचनालयाचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धा परीक्षेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या तरुणाईसाठी हे मार्गदर्शन सत्र नवचैतन्य देणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page