महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ आठव्या दिवशीही उस्फूर्त प्रतिसाद*

 

मुंबई प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” या योगध्यान उपक्रमाला आज आठव्या दिवशी राज्यभरातून अत्यंत उत्स्फूर्त आणि समाधानकारक प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसापासून सातत्याने वाढत असलेला सहभाग आठव्या दिवशीही कायम राहिल्याने हा उपक्रम आता व्यापक चळवळीचे रूप घेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील पत्रकारांनी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष उपस्थित राहून ध्यानसत्रात सहभाग नोंदवला. सततच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी पत्रकारांचा वाढता कल दिसून येत आहे. या उपक्रमामुळे केवळ वैयक्तिक आरोग्य नव्हे, तर माध्यम क्षेत्रात सकारात्मकता, संयम आणि संतुलित दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होत असल्याची भावना सहभागी पत्रकारांनी व्यक्त केली.

या विशेष सत्राला आध्यात्मिक गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सलिल पुळेकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आरोग्यविंगचे प्रमुख भिमेश मुतुला, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे नेतृत्व करणारे संगम कोटलवार यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली.

ज्येष्ठ पत्रकार तथा ‘मॅक्स महाराष्ट्र’चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की, आजच्या डिजिटल आणि वेगवान पत्रकारितेच्या युगात मानसिक संतुलन टिकवणे ही मोठी कसरत बनली आहे. सततच्या ब्रेकिंग न्यूज, राजकीय घडामोडी, सामाजिक तणाव आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे पत्रकारांवर प्रचंड मानसिक दबाव येतो. अशा परिस्थितीत ध्यान आणि प्राणायामासारख्या साधना पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. “माध्यमे समाजाचे प्रतिबिंब असतात. पत्रकार मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सकारात्मक असतील, तरच समाजापर्यंत जाणारी माहिती संतुलित आणि वस्तुनिष्ठ राहील. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांनी सुरू केलेला हा उपक्रम पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवू शकतो.”

आरोग्यविंगचे प्रमुख भिमेश मुतुला यांनी सांगितले की, पत्रकारांचे आरोग्य हा दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. शारीरिक थकवा आणि मानसिक ताण यांचा एकत्रित परिणाम आरोग्यावर होत असतो. त्यामुळे ध्यान, सुदर्शन क्रिया आणि नियमित श्वसनक्रिया या केवळ आध्यात्मिक गोष्टी नसून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आरोग्यवर्धक उपाय आहेत.

मराठवाडा विभागीय अध्यक्ष संगम कोटलवार यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम संघटनात्मक एकतेचेही प्रतीक आहे. राज्याच्या विविध भागांतील पत्रकार एकत्र येऊन ध्यानसाधनेत सहभागी होत आहेत, हीच या चळवळीची खरी ताकद आहे. राज्यभरातून सहभागी झालेल्या पत्रकारांनी संयोजकाचे आभार मानले. लवकरच व्हॉईस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकारी यांच्याशी गुरुदेव श्री श्री रविशंकर संवाद साधणार आहेत.

 

________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page