अमळनेर (प्रतिनिधी): रयत संदेश न्यूज नेटवर्क
भीषण उन्हाळ्याची चाहूल लागताच तहानलेल्या प्रवाशांची आणि नागरिकांची सोय व्हावी या उदात्त हेतूने, अमळनेर येथील दिवंगत संजय प्रल्हाद चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ बस स्थानकासमोर पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार, नगरसेवक नरेंद्र संदानशिव व राजाराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, संजय चौधरी यांचा नातू माहीर पवन चौधरी या बालकाच्या हस्ते श्रीफळ वाढवून जलसेवेचा प्रारंभ करण्यात आला.
दिवंगत संजय चौधरी यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे सुपुत्र आणि तेली युवा समितीचे माजी अध्यक्ष पवन संजय चौधरी यांच्या वतीने दरवर्षी ११ एप्रिल रोजी ही पाणपोई सुरू केली जाते. बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असते त्यामुळे शेकडो तृषार्त नागरिकांची तहान भागण्यास मदत होत आहे.
या प्रसंगी पवन संजय चौधरी यांच्यासह नातू माहीर चौधरी, नंदू चौधरी, अनिल चौधरी, रवींद्र पाटील, शशिकांत आढावे, सुनील चौधरी, तुषार संदानशिव, दत्तू लांडगे, गुलाब पाटील, महेंद्र पाटील, किसन पाटील आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“वडीलांच्या आठवणींना सामाजिक कार्याची जोड देण्यासाठी आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवतो. प्रवाशांची तहान भागवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.”असे पवन संजय चौधरी यांनी उपस्थितांना सांगितले.


