सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांची एरंडोल येथे संविधान बचाव यात्रे निमित्त जाहीर सभा

*भारतीय संविधान हा बहुजनांच्या मुक्ती चा मार्ग आहे.- एरंडोल येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे प्रतिपादन*

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

या देशांमध्ये भारतीय संविधानामुळे मागील 73 वर्षा पासून सर्व समाजाचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत. भारतीय संविधानामुळे देश प्रगतीपथावर आहे. असे असतांना भारतीय संविधान संपवून हिंदुराष्ट्र च्या माध्यमातून ब्राह्मणवादी राष्ट्र अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्याकरिता त्यांनी नवे संविधान सुद्धा बनवून तयार केले आहे. अशा नवीन संविधान बनवणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवले पाहिजे. भारतीय समाजाने अशा लोकांच्या प्रलोभनाला बळी न पडता त्यांची जागा दाखविली पाहिजे. भारतीय संविधान हा बहुजनांच्या मुक्तीचा जाहीरनामा आहे. त्याचे संरक्षण करणे काळाची गरज आहे. अशा पद्धतीचे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी एरंडोल येथे संविधान बचाव यात्रेनिमित्त आयोजित सभेत केले.
सकाळी 10.30 वाजता संविधान बचाव यात्रेला सुरुवात झाली. शेकडोच्या संख्येने सदर यात्रेला संविधान प्रेमींची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते शालिग्रामदादा गायकवाड यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर संविधान बचाव यात्रा श्रावस्ती पार्क, विखरण रोड एरंडोल या ठिकाणी सभेत रूपांतरीत झाली.
या देशाच्या शोषित आणि वंचित समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी ज्या संविधानाचे मोलाचे योगदान आहे त्या संविधानाबद्दल व्यापक जनजागृती अद्याप पर्यंत झालेली नाही. संविधानाने सामान्य माणसाला सन्मान दिला. एससी, एसटी, एनटी ओबीसी, अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्वाची संधी दिली. देशातील समस्त शोषित वर्गाला स्वाभिमानाने जगण्याचे सामर्थ्य दिले. त्यामुळे या देशातील बहुजन वर्गाने संविधानाच्या रक्षणासाठी पुढे आला पाहिजे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित समुदायास केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांनी आज भारतीय समाजाने संविधानाबद्दल सजग राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, धनराज मोतीराय आण्णा, डॉक्टर संदीप कोतकर व वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंचावर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सचिव संजीव बौधनकर, मराठवाडा विभाग प्रमुख मिलींद बनसोडे, आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते शालिग्रामदादा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जावेद मुजावर, अब्दुल कादर, असलम पिंजारी, रवींद्र महाजन, शिवदास महाजन इ. उपस्थित होते. प्रा. नरेंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एरंडोल पोलीस स्टेशनचा पोलीस स्टाफ व पोलीस अधिकारी पाटील साहेब उपस्थित होते.
सत्यशोधक समाज एरंडोल, फुले- शाहू -आंबेडकर युवा मंडळ एरंडोल, बौद्ध समाज मंडळ निपाणे, बौद्ध समाज मंडळ उत्राण, बौद्ध समाज मंडळ बामणे, बौद्ध समाज मंडळ सोनबर्डी, बौद्ध समाज मंडळ जवखेडा, बौद्ध समाज मंडळ कासोदा, श्रावस्ती पार्क उपासक मंडळ एरंडोल, समस्त बौद्ध समाज मंडळ, एरंडोल इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले. मोठ्या प्रमाणावर संविधान प्रेमी जनता सदर कार्यक्रमाला एरंडोल शहर व परिसरातून उपस्थित होती.

You cannot copy content of this page