लोकनायक अण्णा भाऊ साठे

आपल्या उक्ती व कृतीने मानवता उभी करणारा थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे

अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.

भारतात अनेक साहित्यिक झालेत. त्यात महाराष्ट्रात झालेल्या साहित्यिकात वैचारिक,विवेकनिष्ठ वैज्ञानिक,मानवकेंद्रीत लिखाण करणारे म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतले जाते.कारण त्यांच्या लिखाणात तथागत बुध्द, म.फुले, डाॅ. आंबेडकर ,कार्ल मार्क्स यांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या साहित्यिक लिखाणात साम्यवादी मुल्य व आंतरराष्ट्रीय वैश्विकता मांडल्याने रशिया या देशाने त्यांना विदेशात बोलवून सन्मान केला. त्यांच्या साहित्याचे भाषांतर करून विद्यापीठात ते अभ्यासाला ठेवले. स्पॅनिश, फ्रान्स, जर्मनी, रशिया अशा देशात त्यांच्या साहित्य कृती प्रसिध्द झाल्या..

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म
_____________________
व बालपण :

अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावचे रहवाशी होते.वाटेगाव हेच त्यांचे जन्म होय. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झाला.त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले. डोंगर,दरी कपारीतील टुमदार खेडे. हया खेडयात वडिल भाऊराव यांचा शेतात मोलमजुरी करून पोट भरण्याचा व्यवसाय करित. आई वालूबाई व वडिल सोबत टोपल्या व कणग्या त्याचप्रमाणे दोरखंड विणत..मांतग समाजाचा पिढीजात व्यवसाय होता. अण्णाभाऊ साठेंचे घर अगदी गावाच्या शेवटी होते.अण्णा आपल्या मित्रांसोबत खेळ खेळत.खेळात अण्णाभाऊ चपळ होते. अनेक मित्र जीवाभावाचे होते.गावात त्या काळी सवर्ण लोक जातीभेद पाळीत. त्या काळी काही जमातींना गुन्हेगार म्हणून घोषित करत त्यात यांची जमात पण होती. इंग्रजांची भारतात सत्ता असल्यामुळे वेगवेगळे जुलमी कायदे होते. अण्णांचे वडिल इंग्रजांच्या जुलूमाविरुदध लढत. त्यामूळे वेळोवळी धरपकड करुन जमातीतील लोकांना पकडून घेऊन जात.
*अण्णाभाऊ चा शाळेत प्रवेश
परंतू दिड दिवसात शाळा
सोडली*
आई वालुबाई समजदार स्त्री होती. तिला शिक्षणाचे महत्व होते. तिने पुढाकार घेऊन तुकारामाला म्हणजे अण्णाला शाळेत टाकले. पहिला दिवस आनंदात गेला. सवर्ण मुले गरिब मुलांशी स्पर्श टाळत. एकच शर्ट व चड्डी वापरणारा अण्णा. दुसऱ्या दिवशी शिक्षकाच्या मुलाचे व तुकारामाचे भांडण झाले. त्यात तुकारामाने गुरुजींच्या मुलाला मारले. गुरूजींनी मात्र तुकारामाला हातावर व पाठीवर वळ येइ पर्यंत मारले. शेवटी हा मामला पोलीस पाटील याकडे गेला. पोलीस पाटीलांनी पाठीवरील वळ पाहून शिक्षकाला जाब विचारला व खडसावले. परंतू इकडे तुकारामाने निश्चय केला की ह्या शाळेत मला जायचे नाही..आईला हट्ट धरी शाळेत जायचा.दलित मुलांना शाळेत मुक्तपणे स्वातंत्र्य नव्हते. तुकारामाने शाळा सोडली.
भाऊराव साठेंचे मुंबईला प्रयाण
वाटेगावात वडिलांना खूप मेहनत करावी लागे. गावात कधी काम मिळायचे तर कधी नाही. घर चालविणे जिकरीचे झाले. भाऊराव साठेंच्या कोल्हापूर, सातारा, सांगली चे लोक हाताला काम मिळण्यासाठी मुंबई ला जात. त्याप्रमाणे गावात दु:ष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी मुंबई जाण्याचा निर्णय घेतला.दोनशे, अडिचशे किलोमीटर पायी प्रवास करित वडिल, एक लहान भाऊ, दोन बहिणी, तुकाराम साठे म्हणजे अण्णाभाऊ पैशाअभावी पायी जाऊन त्यांनी मुंबई गाठली. इतकी दयनीय परिस्थिती त्यांची होती. मोठी उमेद, जिद्द, उमंग घेऊन मुंबईला आले. अण्णाभाऊ ला बागकाम करण्याचा अनुभव होता. मिळेल ते काम करित मुंबई येथे सुरुवातीला अनेक किरकोळ कामे करून कुटुंबाचे उदरभरण चालु केले.
वाचन, लेखनासाठी मिळाली
प्रतिभेची साथ
अण्णाभाऊ मुंबई ला आल्यावर त्यांनी आपल्या अनुभवातून अक्षराची ओळख करुन घेतली. जिथे वेळ मिळेल तिथे अक्षराचा सराव करित..मराठी बोर्ड वाचत, सत्यशोधक जलसा ऐकत..एका ओळखीच्या पुस्तक विक्रेत्यांकडून मुळाक्षरेची पुस्तके मिळाली. मराठी अचूक येण्यासाठी मराठी चित्रपट ,नाटक बघत..
*कम्युनिस्ट शंकर पगारेमुळे
श्रीपाद डांगेशी ओळख *
अण्णाभाऊ गिरणीत काम करायला लागले ते माटुंग्याला आले. सुरवातीला ते भाईखळयाऊन पायी गिरणीच्या कामाला जात..गिरणी कामगारांच्या व्यथा माहिती झाल्या. त्यात कम्युनिस्ट शंकर पगारे यांच्याशी झाली. कामगार चळवळीत सहभागी झाले.त्यात त्यांचा आवाज उत्तम असल्याने लोकांना प्रबोधनासाठी गीत गायली. कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय झाल्याने श्रीपाद डांगे यांच्याशी झाला. साठेंचा चळवळीशी खूप जवळचा संबंध आला.
अण्णाभाऊंची लेखणी चालली
———————————–
सन 1942 पासून खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांनी लिखाणाला सुरूवात केली. पोवाडे ही ह्याच कालावधीत सुरू होते. कविता व गीत लिहायला तर 20/22 वर्षापासूनच करित होते. ललित लेखनासाठी मॅक्झिम गार्गी यांना आपले दीपस्तंभ मानून रचना केली.
अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरीकार वि. स. खांडेकर आवडते होते. त्यांनी आपली पहिली कादंबरी 1942 ला लिहली ती म्हणजे ‘चित्रा ‘नावाची आहे. लागलीच वारणेचा वाघ ही कादंबरी लिहली. उत्सवात पोवाडे गात. 1942 ला स्टॅनिल गार्ड वर पोवाडा. सहज गीत रचण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. 1949 ला कथालेखनाला सुरूवात केली. मशाल साप्ताहिकात ‘माझी दिवाळी ‘नावाची पहिली कथा प्रकाशित केली. खुळंवाडी हा त्यांचा पहिला कथासंग्रह तो 1957 ला प्रकाशित झाला. साहित्य प्रवास अफाट होता. कादंबऱ्या 35,कथासंग्रह 13,लोकनाट्य 14,पोवाडे 10,नाटके 2,प्रवास वर्णन 1,एकुण 7 कादंबरींवर मराठी चित्रपट निघाले. अण्णाभाऊ यांनी लोकसाहित्य व युगंधर यात वार्तापत्र लिहली.
*लाल बावटा कलापथक
स्थापन*
अमरशेख, दत्ता गव्हाणकर व अण्णाभाऊ यांनी कामगार, वंचित, गरिब, उपेक्षित यांना न्याय मिळण्यासाठी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली. अण्णाभाऊ साम्यवादी पार्टीचे कार्ड होल्डर झाले.
आर्थिक परिस्थिती बेताची
‐———————————-
मुंबई नगरीत आल्याने परिस्थिती बदलते ह्या विश्वासाने आले. परंतु संघर्ष कायम पाठीमागे राहिला. पहिली पत्नी गावावरच वारली. नंतर जयवंता बाईशी नोंदणी विवाह केला. तिला 2 मुले झालीत. शेवटी त्यांनी जीवन जगतांना अनेक लिखाण स्वस्तात प्रकाशकाला दिले. प्रकाशक श्रीमंत झाले मात्र लेखक अण्णाभाऊ गरिब राहिले.
डाॅ. बाबासाहेबांची भेट
———————————–
सन 1949 ला डॉ. भिमराव आंबेडकरांची अण्णाभाऊंची भेट झाली. एक प्रज्ञासुर्य प्रतिभा सूर्याला भेटला. मार्क्सवाद व आंबेडकरवाद यातील फरक लक्षात आला. मार्क्सवादात कामगारांच्या आर्थिक शोषणाचा विचार होता. आंबेडकरवादात कामगारांचे आर्थिक शोषण व जातीय शोषण होते. प्रत्यक्ष बाबासाहेबांचा लढा पाहुन ते भारावले..अन निर्णय घेतला ‘कर बदल करुनी घाव, सांगुनी गेले मज भिमराव ‘.सकल मानवतेचा विचार मनात रुजला. वैश्विक मूल्य हे महत्वाचे त्यामुळे साहित्य हे संवेदनशील, तार्किक बनले. जाती, पाती, धर्म,वंश यापलीकडचा विचार साहित्यात आला. अफाट ग्रंथ संपदा असलेला महान विचारवंत प्रतिगामी मंडळींना समजला नाही. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना साहित्यिक लोकांच्या यादीतही घेतले नाही. परंतु रशियन सरकारने मॉस्को येथे बोलावून त्यांच्या कर्तृत्वाला सलामी दिली.
आज अण्णाभाऊ साठे यांची ढोलताशे यांच्या गजराने अभिवादन होते परंतू विचाराचे मंथन होत नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक साहित्याने सारा समाज जागा होवो ही आशा व्यक्त करतो.
साहित्यिक
—————–
लेखन :- एस. एच. भवरे सर

You cannot copy content of this page