क्रांतीवीर,लोकनायक, अण्णा भाऊ साठे

*क्रांतिवीर,लोकनायक
अण्णाभाऊ साठे*

अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.

आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊनी साहित्य क्षेत्रात विपुल असे लेखन केले .ते एक कादंबरी कार, कथालेखक ,कवी, शाहीर होते .ते एक वंचित परंतु सर्जनशील प्रतिभावंत आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होते. ते एक अनुभव विश्वातील झुंजार लेखक ,कलाकार व अभिजात सांस्कृतिक परंपरेशी संबंधित होते. वंचित व उपेक्षित लोकांचे दुःख अण्णाभाऊनी साहित्यातून पुढे आणले त्यांचे साहित्य समाजाचं, माणसांच्या जगण्याचं ,त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचं प्रतिबिंब होतं .बंडखोर ,विद्रोही आणि मार्क्सवादी लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाकडून जीवनाकडे आणि त्यांनी घडवलेल्या संघर्षाकडे पाहणे आवश्यक आहे .समाज सुधारक, साहित्यिक , लोकशाहीर, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे.
दिनांक एक ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे भाऊ सिधोजी साठे व वालुबाई यांच्या पोटी अण्णाभाऊंचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. .गावात खूप जाती राहत होत्या गाववाड्यात स्थान नसलेल्या भटक्या मुक्त आणि पूर्वी इंग्रजांनी गुन्हेगार ठरविलेल्या जातींचा वावर आजही तेथे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचं जगणं, मरण अण्णाभाऊ पाहत होते या बहुतेक जातींना अण्णाभाऊंच्या साहित्यात स्थान मिळाल आहे .काही जाती तर प्रथमच मराठी साहित्यात अवतीर्ण झाल्या त्या अण्णाभाऊंमुळेच.
अण्णाभाऊ वयाच्या अकराव्या वर्षीच (1931) दुष्काळाने होरपडल्यानंतर कुटुंबासोबत मुंबईकडे निघाले .खिशात पैका नाही, प्रवासाचे साधन नाही, पायी वणवण करीत 227मैलांचा प्रवास सुमारे दोन महिन्यात पूर्ण केला. मुंबईत पोहोचले. मुंबईतल्या झोपडपट्टीतले बकाल व भकास जीवन यातून जीवन शिक्षण मिळवलेला हा स्वशिक्षित कार्यकर्ता डाव्या, आंबेडकरवादी चळवळी व साहित्य क्षेत्रात चमकला. पूर्णवेळ जगण्यासाठीच्या लढाईत जुंपलं गेलेला हा संवेदनशील किशोर युवा क्रांतीच्या आणि स्वराज्य निर्मितीच्या चळवळीशी जोडला गेला.
इंग्रजांनी काही जातींना गुन्हेगार ठरवून 1871 मध्ये गुन्हेगार जमाती कायदा केला .त्यात अण्णाभाऊंच्या मांग जातीचा समावेश होता. या कायद्याविरुद्ध कम्युनिस्टांनी तामिळनाडू मध्ये प्रदीर्घ लढा दिला. गुन्हेगारी शिक्का हा अण्णाभाऊंच्या तीन पिढ्यांपर्यंत होता. करवीरच्या राजश्री शाहू महाराजांनी एक ऑगस्ट 1918 ला हजेरी बंद केली परंतु इतरत्र वीस लाखाहून अधिक लोक जन्मजात गुन्हेगार कायद्याच्या प्रभावाखाली होते ब्रिटिश कायद्याचा हेतू हा की या जातीतील झुंजार वृत्ती नाहीशी व्हावी, लाचारी वृत्ती यावी हा होता.
अण्णाभाऊना 49 वर्षाचे आयुष्य मिळाले समाज परिवर्तनाची तळमळ आणि विचारांची स्पष्टता यातून निर्माण झालेले साहित्य केवळ मनोरंजन नव्हते तर समाज प्रबोधन हा ध्यास होता. शोषितांना त्यांच्या मुक्तीचा विचार आणि मार्ग सुचविणे व न्यायाचे व सनदशीर लढ्यासाठी त्यांना तयार करणे हा उद्देश त्यांनी कधी लपवून ठेवला नाही. अण्णाभाऊंनी आपल्या विद्रोही गीतातून कष्टकऱ्यांना समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होण्याची हाक दिली होती. साम्यवाद, समाजवाद, आंबेडकरवाद, स्री मुक्ती, स्री पुरुष समानता, स्री अधिकार, आदी प्रश्नांवर जनतेला जागृत करण्याचा हेतू असल्याने त्यांचे लेखन वास्तववादी होते .
आपण गलिच्छ वस्तीत राहत असलो तरी आपले मन स्वच्छ असावे. जे जगतो ,तेच लिहितो आम्हीही इतरांप्रमाणे माणसे आहोत, आम्हालाही भावना आहेत,.इतरांप्रमाणे स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, जे हौसेने उपवास करतात त्यांच्या जीवनात , साहित्यात विनोद येतो ,जे सक्तीने उपवास करतात त्यांच्या साहित्यात क्रांतीच्या ठिणग्या येतात असे अण्णा म्हणत.
हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. असे 1958 मध्ये दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अण्णा भाऊंनी सांगितले आहे .कष्टकऱ्यांचे हातच विकास घडवत असतात, शब्दाला नुसता आकार देणे सोपे असते पण आकाराला आत्मा देणे अवघड असते .साहित्याला केवळ कल्पनेचे पंख असून चालत नाही तर वास्तवाचे पायही असावे लागतात असे अण्णाभाऊ म्हणत
तमाशाचा वापर लोक प्रबोधनासाठी अण्णाभाऊंनी खुबीने केला त्यामुळे 1948 ला तमाशावर बंदी घालण्यात आली तेव्हा याच सादरीकरणाला तमाशा ऐवजी लोकनाट्य असा पर्यायी समर्पक शब्द देण्याचे कामही केले आणि तमाशा वरील बंदी उठविण्यासाठी आग्रह धरला .”जग बदल घालुनी घाव ,सांगून गेले मला भीमराव ”अशी जग बदलण्याची भाषा करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे स्मरण आपल्याला सर्वांना प्रेरणादायी ठरते.


*लेखन:- प्रा अशोक पवार, अध्यक्ष:-युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर.*

You cannot copy content of this page