*नागपूर प्रतिनीधी –
आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आज रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चाळीसगाव ते कन्नड मार्गावरील औट्रम घाटातील बोगदा प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
अनेक वर्षांपासून रखडलेला या महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्पामुळे जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. यामुळे या प्रदेशातील पर्यटन, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा वेग मिळणार आहे.
यावेळी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी चाळीसगाव मतदारसंघातील विविध विकासकामांसाठीही केंद्रीय मंत्री गडकरीजींकडे विशेष विनंती केली. त्यात चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील गिरणा नदीवरील ऋषीपांथा येथे मोठा पूल बांधकाम करणे, चाळीसगाव शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते विराम हॉटेल या मार्गाचे चौपदरीकरण करणे, शहरातील मोठी गुजरी (तितुर नदीवरील) पूल बांधकाम करणे, तालुक्यातील कोंगानगर – भामरे – वाघळी – न्हावे रस्ता सुधारणा करणे या सर्व कामांसाठी केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली असून, मा. गडकरीजींनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.




