साळवा (प्रतिनिधी):- रयत संदेश न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व स्त्रीमुक्ती दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. डी. मोरे होते. सावित्रीबाईंनी वंचित, उपेक्षित तसेच स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्याच्या बहुमान प्राप्त करून दिला. अशा आद्य शिक्षिका मुख्याध्यापिका व श्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई या इतिहासात अजरामर झाल्या असे सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ. रंजना नेते उपस्थित होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा सविस्तर इतिहास सांगत स्त्रीशिक्षण व सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या अमूल्य कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट भाषणे सादर केली. भावना कोळी या विद्यार्थिनीने सावित्रीबाईंच्या जीवनावर सुंदर गीत गायन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. भाषण, गीत व नाटिका स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक जी. व्ही. नारखेडे, ए. वाय. शिंगणे, व्ही. एस. कायंदे, एस. व्ही. राठोड, एस. पी. तायडे, बी. आर. बोरोले तसेच ज्येष्ठ शिक्षिका निता पाटील, गुणवंती पाटील, प्रतिभा पाटील, वर्षा नेहेते, पौर्णिमा वारके व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.




