अमळनेर प्रतिनिधी : रयत संदेश न्यूज
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक व कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव येथे प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्त्री शिक्षणाचे महत्त्व व समतेचे मूल्य अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर. महाजन व स्काऊट शिक्षक एच. ओ. माळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष ए. जी. महाजन सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर सखोल मनोगते व्यक्त केली.
इयत्ता आठवीतील सपना भिल, वैभवी पाटील, दीपिका पाटील, प्रीती जाधव, कोमल पाटील, वेदिका पाटील, शिवानी बैसाणे,
इयत्ता नववीतील अर्पिता बोरसे, खुशी पाटील, प्रीती पाटील, जयश्री पाटील, कृष्णा पाटील,
तर इयत्ता दहावीतील शुभांगी पाटील, निशा जाधव, वैष्णवी श्याम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण, सामाजिक समता व अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या संघर्षपूर्ण कार्याचा आढावा घेतला. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
प्रमुख अतिथी एच. ओ. माळी यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, जातीभेद निर्मूलन व सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष केल्याचे सांगितले. “त्यांचे कार्य आजच्या महिला पिढीसाठी दीपस्तंभ आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षणक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षणाचा प्रसार करताना त्यांना समाजाकडून प्रचंड विरोध, अपमान व यातना सहन कराव्या लागल्या, तरीही त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. “त्यांचे कार्य आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक आय. आर. महाजन यांनी केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ जयंती उत्सव न राहता सामाजिक जाणीव जागवणारा व प्रेरणादायी ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले



