जळगाव प्रतिनिधी : रयत संदेश न्यूज
जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हीरक महोत्सवी उपक्रमांतर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सभा, पत्रकार बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिर, सहभोजन तसेच भोजनपूर्व मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. सुधीर भटकर, जळगाव जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
*“सद्यस्थितीतील पत्रकारिता”* या विषयावर बोलताना संदीप घोरपडे यांनी आजची पत्रकारिता संधींनी परिपूर्ण असूनही शब्दसंपदेच्या अभावामुळे ती बोथट होत असल्याची खंत व्यक्त केली. शब्दांचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी संत तुकाराम महाराजांचा संपूर्ण अभंग उद्धृत केला—
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन
शब्द वाटूं धन जनलोका
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव
शब्दाची गौरव पूजा करू”
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या लोकहितवादी पत्रकारितेचा दाखला देत त्यांनी पत्रकारांनी लेखणीला धार देण्याचे आवाहन केले. समाजातील अपप्रवृत्तींचा नाश करण्यासाठी त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, उपजीविका व शिक्षण या *सप्तधारयुक्त क्षेत्रांतील* उणिवा निर्भयपणे मांडण्याची गरज व्यक्त केली.
सामाजिक अधःपतन, वाढता भ्रष्टाचार, गरीब-श्रीमंत दरी, महागाई, रोजगाराचा अभाव, शैक्षणिक धोरणातील त्रुटी, राजकारणातील पक्षपातीपणा व आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकार यावर त्यांनी परखड निरीक्षणे नोंदवली. निर्भय व प्रामाणिक पत्रकारितेमुळेच समाजहित साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




