पुर्णवाद परिवारातर्फे अमळनेर भूषण व सेवाव्रती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

जीवन कला संस्कार केंद्र अमळनेर व श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५ – २६ या वर्षातील ‘अमळनेर भुषण पुरस्कार’ श्री ओमप्रकाशजी मुंदडा तर ‘घ.भी. धांडे सेवाव्रती पुरस्कार’ डॉ. अविनाशजी जोशी यांना नुकताच सन्मानपूर्वक देण्यात आला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.भरत अमळकर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री गुणेशजी पारनेरकर उपस्थित होते. पुरस्कारार्थी श्री ओमप्रकाश मुंदडा व डॉ.अविनाश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ.अमळकर यांनी केशव स्मृती समूहाच्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला व उपस्थितांशी संवाद साधला. श्री गुणेशजी पारनेरकर यांनी त्यांचे प्रबोधनात व्यक्तीची उन्नती ही समाज उन्नती होण्यासाठी आवश्यक आहे . संस्कार व संस्कृती यातील फरक विषद करून त्यांनी मार्गदर्शन केले की संस्कार हे व्यक्तीवर होतात तर , संस्कृतीचे दर्शन समाजातून होते. केवळ सामाजिक विकास हे ध्येय न ठेवता व्यक्ती , व्यक्तित्व व व्यक्तिमत्व घडवणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी अनेक मान्यवर व्यक्तींचे सत्कार करण्यात आले .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगेशजी पाटील यांचे मधुर बासरी वादन झाले. सौ.पपीता जोशी यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचलन केले. जीवन कला संस्कार केंद्राचे अध्यक्ष डॉ.अशोक रावेरकर मंचावर उपस्थित होते. यावेळी अमळनेर,सावदा,जळगाव व धुळे येथील सर्व शिष्यवृंद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर व परिसरातील मान्यवर व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page