धरणगाव केंद्रात साळव्याचा झेंडा! सार्थकने मिळवलेले हे यश.

धरणगाव (प्रतिनिधी) : रयत संदेश न्यूज नेटवर्क

साळवा धरणगाव येथील साने गुरुजी प्राथमिक सेमी इंग्रजी विद्यालयाचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सार्थक आशिष नारखेडे याने महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) स्पर्धा परीक्षेत धरणगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून दिमाखदार यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे साळवे गावासह परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

अतिशय लहान वयातच सार्थकने मिळवलेले हे यश त्याच्या जिद्दीचे, परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या व आई-वडिलांच्या सक्षम मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मानले जात आहे. त्याच्या या यशामुळे शाळेचा नावलौकिक उंचावला असून इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.

 

या यशाबद्दल ग्राम सुधारणा मंडळाचे चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे तसेच साळवे इंग्रजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. मोरे यांच्या हस्ते सार्थकचा सत्कार करण्यात आला. यावेळी साने गुरुजी सेमी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री कोल्हे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी सार्थकचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

सार्थकच्या या यशामुळे शाळा व गावाचा लौकिक वाढला असून भविष्यातही तो अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page