म.सा.परिषदेच्या वतीने पातोंडा येथे ‘संत विचारांचे जागर” अंतर्गत व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर गाव केंद्रस्थानी ठेवून विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, असे तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून सांगितले आहे. ग्राम समृद्ध व ग्राम कल्याणासाठी प्रत्येक गावात ग्रामगीतेचे पारायण झाले पाहिजे. गाव प्रगतीपथावर गेले तर देशाचा विकास साधला जाईल असे मत शिवशाही फाउंडेशनचे सचिव तथा ‘दै. सकाळ’चे पत्रकार उमेश काटे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर व पातोंडा परिसर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एकादशीच्या पार्श्वभूमीवर ‘भारतीय संत साहित्याचा जागर’ या अंतर्गत व्याख्यानाचे तिसरे पुष्प गुंफले. पातोंडा (ता. अमळनेर) येथील श्री दत्त मंदिरात परिसरात “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज- जीवन कार्य” या विषयावर ते बोलत होते. सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्रदीप लोहारे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ‘मसाप’ चे अध्यक्ष संदिप घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते. आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार, ‘मसाप’चे उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र निकुंभ, गोकुळ बागुल, समन्वयक मनोहर नेरकर, डी ए सोनवणे, एस पी अहिरे, सरपंच मनीषा मोरे, माजी सरपंच शितल पाटील, विलास चव्हाण, रवींद्र बोरसे, मंगेश गाडगे, योगेश्वर पाटील, संदिप पाटील, चंद्रकांत पवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. काटे यांनी ‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव… देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे’ या अभंग रुपी भजनाने व्याख्यानाला सुरुवात केली. देव दगडात नाही, लाकडात नाही तर तो या भूतलावावर चराचरामध्ये वसलेला आहे. देवाची व्याप्ती फार व्यापक आहे. देव मंदिरात शोधण्यापेक्षा आपल्या कर्मामध्ये देव शोधा. संतांच्या विचारांनी माणसात माणुसकी फुलते, तुकडोजींच्या वाङ्मयातून ग्रामजागरणाचा प्रकाश पसरतो. संत तुकडोजी महाराज यांनी 1962 च्या भारत चीन युद्ध व 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी मनोधैर्य खचलेल्या भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी खंजिरीवादक भजनांच्या माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला होता. श्री काटे यांनी आपल्या व्याख्यानाचा शेवट “भक्ती विना देव दिसत नाही… पैशाविना संसार चालत नाही… कोणता मार्ग मी धरु… भक्ती करू की पोट भरु… सांगा मी काय करू ” या भजनाने केला. निरंजन पेंढारे यांनी प्रास्ताविक केले. शरद पाटील यांनी सूत्रसंचालन तर अमित पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page