अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क 
महात्मा ज्योतिराव फुले यांनी राबवलेली चळवळ ही आत्मसन्मानाची होती आणि त्यातूनच सामाजिक तथा शैक्षणिक जागृती निर्माण होऊन समाज व्यवस्थेत परिवर्तन घडून आले. समस्त बहुजन वर्गाला शिक्षण प्रवाहात सहभागी करून घेऊन त्यांचे आत्मभान जागृत करण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांचा मोलाचा वाटा होता. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशाच्या भूमीत सामाजिक आणि शैक्षणिक विचारांचे बिजारोपण केलेले आहे त्यामुळेच महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्रा.डॉ. राहुल निकम यांनी कळमसरे तालुका अमळनेर येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा पट त्यांनी ग्रामस्थांसमोर मांडला. 
सदर कार्यक्रमाचे आयोजन कळमसरे येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच जगदीश निकम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच पिंटू राजपूत, युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेरचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, बापूराव ठाकरे हे होते. या प्रसंगी प्रा. अशोक पवार यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले आणि आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे पत्रक उपस्थितांना वाटण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन मोतीभाऊ महाजन यांनी केले. सर्व ग्रामस्थांनी परस्परांना महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.


