अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
आजच्या महाग झालेल्या शिक्षणाने सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून परावृत्त होत असताना… आपल्या गरिबीच्या परिस्थितीवर मात करून कळमसरे तालुका अमळनेर येथील विद्यार्थिनी कु. नाजमीन मेहमूदखान पठाण हिने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात गोल्ड मेडल ही पदवी मिळवून खेड्यातली गुणवत्ता कशी सरस असते याचे उदाहरण दाखवून दिलेले आहे. नाजमीन ही शारदा माध्यमिक विद्यालयात प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमात भाग घेत होती. शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी तिला वेळोवेळी वकृत्व, निबंध, वाद विवाद, नाटक, एकपात्री यासाठी तिच्यातील कौशल्य ओळखून तिला संधी देत आलेले होते. त्या संधीचा योग्य फायदा घेत तिने आपल्या गुणाचा उपयोग करून शाळेचे नाव उज्वल केलेले होते. बारावीनंतर नाजमीन हे मारवड येथील सीनियर कॉलेजला राज्यशास्त्र विषय घेऊन शिक्षण घेऊ लागली. या ठिकाणी ही नाजमीन ने कमवा व शिका या योजनेअंतर्गत सहकार्य मिळवून कॉलेजच्या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेतला. युवा रंगाच्या कार्यक्रमांत प्रत्यक्ष भाग घेतला. अमळनेर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात युवा प्रमुख म्हणून तिने उत्कृष्ट भूमिका निभावलेले होती. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर अप्रतिम एकपात्री प्रयोग तिने साऱ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. घरची परिस्थिती अगदी बेताची असताना तसेच समाजामध्ये मुलींना शिकविण्याचे प्रमाण अत्यल्प असताना वडिलांनी मुलींना शिक्षणासाठी तयार केले. राज्यशास्त्रामध्ये मारवाड कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी नाजमीन ला मार्गदर्शन केले. संस्थेच्या प्राचार्य तथा संचालक मंडळांनी वेळोवेळी या मुलीचे कौतुक करून तिला प्रोत्साहन दिले. नाजमीन या युवतीमध्ये अनेक कौशल्य लपलेले आहेत. आता सध्या ती एलएलबी साठी औरंगाबाद येथे प्रवेशित झालेली आहे. भावी आयुष्यात तिला उत्कृष्ट कायदे सल्लागार तसेच न्यायाधीश होण्याची इच्छा आहे. कळमसरे येथील मुस्लिम समाजातील वकील ह्या शिक्षणासाठी मेहनत घेणारी ती एकमेव मुलगी आहे. घरामध्ये संस्काराचे बीज मिळून मुलांच्या आयुष्यात वेगळे कलाटणी मिळालेली आहे. नाजमीन ही उत्कृष्ट अभिनय करणारी युवती आहे. वादविवाद ते उत्स्फूर्त भाषणातही तिचा दबदबा आहे. आपल्या माध्यमिक शिक्षकांपासून ते कॉलेजच्या शिक्षकांपर्यंत ती सर्व गुरुजनांचा नेहमी सन्मान करते. तिच्या या यशामुळे गावातील ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळींनी तिचे कौतुक केलेले आहे.



